Charge Mobile in One minute
मोबाइल, लॅपटॉप असो अथवा इलेक्ट्रिक कार या तीन वस्तूंमध्ये एक समान घटक आहे आणि तो म्हणजे बॅटरी. या वस्तू बॅटरीवर चालतात. त्यामुळे साहजिकच एका ठराविक कालावधीनंतर बॅटरी चार्ज करावी लागते. सामान्यतः इलेक्ट्रॉनिक उपकरणं चार्ज करण्यासाठी किमान 30 मिनिटं लागतात. आता एका नवीन संशोधनामुळे हा वेळ वाचणार आहे. कारण मोबाइल, लॅपटॉप आता एका मिनिटात, तर इलेक्ट्रिक कार अवघ्या दहा मिनिटांत चार्ज करता येणार आहे. एका संशोधकाने यासाठी एक नवीन तंत्र विकसित केलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
इलेक्ट्रॉनिक उपकरणं चार्ज करण्यासाठी सामान्यतः 30 मिनिटं लागतात; पण विज्ञान आणि तंत्रज्ञान वेगानं बदल आहे. त्यामुळे तुम्ही आता खराब लॅपटॉप किंवा मोबाइल फोन एका मिनिटांत तर इलेक्ट्रिक कार दहा मिनिटांत चार्ज करू शकणार आहात. मूळ भारतीय वंशाच्या एका संशोधकाने एक नवीन तंत्र विकसित केले आहे. हे तंत्र ही कामं अगदी काही मिनिटांत करू शकते.
अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो बोल्डरमध्ये कार्यरत असलेले केमिकल आणि बायोलॉजिकल इंजिनीअरिंगचे सहायक प्राध्यापक अंकुर गुप्ता आणि त्यांच्या संशोधकांच्या टीमने हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. हे तंत्रज्ञान प्रोसेडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे.
‘हे संशोधन ईव्ही, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि पॉवरग्रिडसाठी महत्त्वाचे आहे,’ असं गुप्ता यांनी सांगितलं. पॉवर ग्रिडबाबत बोलताना गुप्ता म्हणाले, की ‘ऊर्जेच्या मागणीतल्या चढ-उतारांमुळे कमी मागणीच्या काळात चांगल्या साठवणुकीची गरज असते. तसंच जास्त मागणीच्या काळात जलद वीज वितरणाची हमी असते. भविष्यातली ऊर्जेची महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेता मला माझे रासायनिक आभियांत्रिकीचे ज्ञान ऊर्जा साठवण उपकरणांवर लागू करण्याची प्रेरणा मिळाली.
गुप्ता यांनी सांगितलं की, ‘सुपर कॅपेसिटरची गती महत्त्वाची असते. आपण त्याचं चार्जिंग आणि ऊर्जा सोडण्याची गती आयनच्या अधिक कार्यक्षम हालचालीपेक्षा कशी वाढवू शकतो? आमच्या संशोधनासाठी ही मोठी झेप आहे आणि आम्ही यातली अज्ञात गोष्ट शोधून काढली आहे.’ हा शोध काही मिनिटांत हजारो परस्पर जोडलेल्या छिद्रांच्या जटिल नेटवर्कमध्ये आयन प्रवाहाचं अनुसरण करण्यास सक्षम असतो, असं संशोधकांनी नमूद केलं.
संशोधकांनी सूक्ष्म छिद्रांच्या जटिल संरचनेत आयनच्या लहान प्रभारित कणांची गती शोधली. गुप्ता म्हणाले, की ‘या यशामुळे सुपर कॅपेसिटरसारख्या चांगल्या स्टोरेज उपकरणांच्या विकासाला गती मिळू शकते. सुपरकॅपेसिटर हे पॉवर स्टोरेज डिव्हाइस आहे, जे त्याच्या छिद्रांमधल्या आयन स्टोरेजवर अवलंबून असतं. यावरून असं म्हणता येईल, की सुपरकॅपेसिटर बॅटरीपेक्षा जलद चार्ज होऊ शकतात आणि जास्त काळ टिकू शकतात,’ असं गुप्ता यांनी सांगितलं.